रत्नागिरी : ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने ऑनलाइन फसवणुकीचा एक मोठा प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. साईगण, वृंदावन सोसायटी, कुवारबांव येथील एका महिलेची तब्बल ९ लाख ९६ हजार ९९१ रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना ८ मे २०२५ ते २७ मे २०२५ दरम्यान घडली असून, ६ जून २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रोहिणी मंदार गीते (वय ४५, रा. साईगण, वृंदावन सोसायटी, कुवारबांव, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काही अज्ञात आरोपींनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भात एक जाहिरात ठेवली होती. स्केचर्स कंपनीमध्ये कामासाठी त्यांना टेलिग्राम अकाऊंटवर माहिती देण्यात आली. सुरुवातीला कस्टम ऑर्डरसाठी भरलेल्या रकमेवर त्यांना योग्य परतावा देण्यात आला, ज्यामुळे फिर्यादीचा विश्वास संपादन झाला.
त्यानंतर, फिर्यादी रोहिणी गीते यांनी बँक ऑफ इंडिया आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खात्यांमधून एकूण ९,९६,९९१/- रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, या रकमेवर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही, तसेच गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळाली नाही. अशा प्रकारे त्यांची फसवणूक करण्यात आली.
या गुन्ह्यात एक अज्ञात महिला आणि ‘प्रवीण’ नावाचा एक व्यक्ती (पूर्ण नाव, गाव, पत्ता अज्ञात) यांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा क्रमांक २४१/२०२५ दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 07-06-2025














