रत्नागिरी : लांजा तालुक्यातील विलवडे येथील मनोहर यशवंत वडवलकर (वय ६५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना ४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास घडली असून, त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संदर्भात ६ जून २०२५ रोजी रात्री ११.२६ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ३१/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर वडवलकर हे त्यांच्या घरामागील पडवीजवळ कोंबड्यांना दाणे घालत होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते पडवीच्या भिंतीला डोके टेकवून उभे राहिले. हे पाहताच त्यांच्या मुलाने आणि एका जवळच्या व्यक्तीने त्यांना पाणी दिले.
त्यानंतर, त्यांना तात्काळ खासगी वाहनाने लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण ‘ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्कशन’ (Acute Myocardial Infarction) म्हणजेच तीव्र हृदयविकाराचा झटका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे विलवडे गावावर शोककळा पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 07-06-2025













