लांजात दुर्दैवी घटना : चुलीच्या आगीने भाजून मतिमंद महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील गवाणे, रेवाळेवाडी येथे एका अत्यंत दुर्दैवी घटनेत ४४ वर्षीय मतिमंद महिलेचा चुलीच्या आगीने भाजून मृत्यू झाला आहे. नंदा कमलाकर रेवाळे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना गंभीर भाजलेल्या अवस्थेत रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ५ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास घडली असून, ६ जून २०२५ रोजी रात्री ११.४० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ३२/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदा रेवाळे या लहानपणापासून मतिमंद होत्या. त्या आपल्या घरात असताना चुलीमध्ये विस्तव पेटवून शेकोटी घेत होत्या. यावेळी चुलीतील विस्तवाने त्यांच्या अंगावरील साडीने अचानक पेट घेतला. यामुळे त्या पायापासून मानेपर्यंत गंभीररीत्या भाजल्या.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, परंतु भाजण्याचे प्रमाण (७०%) जास्त असल्याने आणि ‘सेप्टिक शॉक’मुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. उपचारादरम्यानच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे रेवाळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लांजा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 07-06-2025