मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यभरातील महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना चांगल्या प्रकारे होत आहे. या योजनेसाठी शासनाकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.

मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे आदिशक्ती मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे उपस्थित होते. संत मुक्ताई यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगरला आलो असून, पांडुरंगाकडे राज्यात यंदा दमदार पाऊस होवो व शेतकरी सुखी होवो यासाठीची प्रार्थना करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विमानतळावर पिंक रिक्षात बसून केला प्रवास..
विमानतळावर आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिला चालक असलेल्या पिंक रिक्षातून विमानतळ ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रिक्षाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या पिंक रिक्षाचे सारथ्य रंजना सपकाळे या लाडक्या बहिणीने केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 07-06-2025