रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील वातानुकूलित विश्रामगृहात (Executive Lounge) एका व्यक्तीने रिसेप्शनच्या ड्रॉवरमधून २५ हजार रुपयांची रोकड चोरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रत्नागिरी पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे हा प्रयत्न फसला आणि काही वेळातच आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी, नाशिक येथील रहिवासी तेजस अजित छाबडा (३२) हा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये काही दिवसांपासून तासाच्या भाड्याने वास्तव्यास होता. शुक्रवार, दिनांक ०६ जून २०२५ रोजी सकाळी ८.५५ वाजण्याच्या सुमारास तेजसने रिसेप्शनिस्टची नजर चुकवून, संधी साधत रिसेप्शन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले २५,००० रुपये असलेले रोख डबा चोरले आणि तिथून पळ काढला.
या घटनेची माहिती रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कुवारबाव चौकीतील पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कुवारबाव पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार तात्काळ कोकण रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी एक्झिक्युटिव्ह लाउंजमधील रिसेप्शन काउंटरवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये आरोपीच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पेहरावावरून त्याची ओळख पटली आणि तो रिक्षात बसून निघून गेल्याचे निष्पन्न झाले.
या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील डिटेक्शन टीमच्या अंमलदारांनी तातडीने कार्यवाही केली. त्यांनी या रिक्षाचा रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून रत्नागिरी एस.टी. स्टँडपर्यंत पाठलाग केला आणि आरोपी तेजस अजित छाबडाला एस.टी. स्टँड येथून त्वरित ताब्यात घेतले.
आरोपी तेजस अजित छाबडा याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला १००% मुद्देमाल, म्हणजेच २५,००० रुपये रोख रक्कम, तात्काळ हस्तगत केली आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर आणि खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बजावली आहे :
स.पो.फौ/७०८ श्री. दीपक साळवी, गुन्हे प्रकटीकरण पथक, रत्नागिरी शहर पो. ठाणे
पो.हवा/५७४ श्री. अरुण चाळके
पो.हवा/७१७ श्री. संतोष गायकवाड (कुवारबाव चौकी)
पो.हवा/९५७ श्री. महेंद्र खापरे (कुवारबाव चौकी)
पो.हवा/६६४ श्री. राकेश तटकरी (कुवारबाव चौकी)
पो.हवा/६३५ श्री. निलेश कांबळे
चा.पो.हवा/१५५४ श्री. ओंकार सावंत
या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे रत्नागिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 07-06-2025














