चिपळूणमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश : ६५ वर्षीय आरोपी अटकेत, १९ हजार रुपयांचा गांजा जप्त

रत्नागिरी, ०७ जून २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विक्री आणि सेवनास प्रतिबंध घालण्याच्या पोलीस दलाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. चिपळूण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, ६५ वर्षीय व्यक्तीला १९,६२० रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शुक्रवार, ०६ जून २०२५ रोजी चिपळूण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. हर्षद हिंगे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, खेर्डी शिगवणवाडी, मुस्लिम मोहल्ला येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे.

या माहितीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांनी तात्काळ एक पथक खेर्डी शिगवणवाडी, मुस्लिम मोहल्ला येथे पाठवले. तिथे एका घरासमोर पिवळ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन बसलेला एक संशयित व्यक्ती पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रुकनुद्दीन इब्राहीम बंदरकर (६५, रा. खेर्डी शिगवणवाडी, मुस्लिम मोहल्ला, ता. चिपळूण) असे सांगितले.

पंचनामा करून झडती घेतली असता, रुकनुद्दीनच्या ताब्यात असलेल्या पिशवीत काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या आणि बिया असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला गांजासदृश्य अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ३२७ ग्रॅम वजनाचा, १९,६२० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

आरोपी रुकनुद्दीन इब्राहीम बंदरकर याला ताब्यात घेण्यात आले असून, चिपळूण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १३३/२०२५ अन्वये गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब), ii (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकातील पो.उ.नि. श्री. हर्षद हिंगे, पो. हवा/११५१ श्री. वृषाल शेटकर, पो. हवा/६१७ श्री. संदीप मानके, पो.ना/१५३३ श्री. रोशन पवार, पो.थी/१३२२ श्री. कृष्णा दराडे आणि पो.शी/१४४४ श्री. प्रमोद कदम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 07-06-2025