रत्नागिरी, [रविवार, ८ जून २०२५] : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-बावनदी घाटात आज (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. टँकरने मिनी बसला मागून जोरदार धडक दिल्याने बस ४० फूट खोल दरीत कोसळली, तर टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाली. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आज सायंकाळी ६ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, पलटी झालेल्या टँकरमध्ये अजूनही २ टन गोठलेला एलपीजी वायू आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अजून किमान २ तास लागतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर (क्रमांक एन एच ०१ एन ४६२८) चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एका मिनी बसला (वडापची गाडी) मागून धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन थेट ४० फूट खोल दरीत कोसळली. त्याचवेळी टँकरही रस्त्याच्या बाजूला पलटी झाला आणि त्यातून गॅसची गळती सुरू झाली. गॅस गळतीमुळे परिसरातील एका घराला आणि गुरांच्या चाऱ्याला आग लागली, ज्यात एक म्हैस भाजली गेली.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास आणि बचावकार्य सुरू करण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेत ३१ हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये संकेत कृष्णकांत जागुष्टे, विराज राजाराम सावंत, मंदा सुखदेव खाडे, स्मिता मधुकर पाटील, उषा अमोल खुडे, जयश्री सूर्यकांत गावडे, प्रियांका दिलीप जाधव, नेहा संतोष मेस्त्री, धर्मेंद्र दत्तात्रय देरुगडे, दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे, सुलक्षणा संभाजी पाटील, निशिकांत दीनानाथ वानरकर, वृषाली सुकांत यादव, हर्षाली हेमंत पाकळे, नीता विनायक बांद्रे, मीना सुभाष घाडगे, सोनाली हरेश सावंत, कमल किशोर किशन महाडिक, प्रेमकुमार बबन शिवगण, अमोल गणेश कोतवाल, मनीषा संतोष कांबळे, मालिनी दीपक चव्हाण, श्वेता संजय चव्हाण, प्रियंका जाधव, राजेश यादव, गणेश महादेव सावर्डेकर, सुरेंद्र दीपक सावंत, सचिन अशोक पोकडे, उदय पांडुरंग खताते, अरविंद अनंत सकपाळ आणि मीना विनायक सिरकर यांचा समावेश आहे.
अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ही वाहतूक पाली आणि संगमेश्वर मार्गे पर्यायी मार्गावर वळवली. गॅस गळतीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला.
या अपघातातील जखमी झालेले मिनी बसमधील प्रवासी हे रत्नागिरीत सुरू असलेल्या शिक्षक प्रशिक्षणासाठी जात होते. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या अपघाताची दखल घेतली असून, जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस या अपघाताचे अधिक तपास करत आहेत.













