रत्नागिरी, [०७ जून २०२५] : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भातील गुन्हे समूळ उच्चाटन करण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार दापोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काल, शुक्रवार, ७ जून २०२५ रोजी दापोली पोलीस ठाणे हद्दीतील विसापूर येथील समशेर अली नगर मोहल्ला येथे गोवंश जनावरे कत्तल करण्याकरिता कोंडून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या गुप्त बातमीची शहानिशा करून, दापोली पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात, एका गोठ्यामध्ये बांधून आणि कोंडून ठेवलेले बैल, गायी आणि छोटी वासरे आढळून आली. तसेच, मोहल्ल्यामध्ये हानीफ शेख अली मालवणकर याच्या घराशेजारील जंगलसदृश भागातही केलेल्या पाहणीत कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेली आणखी ३ गोवंश जनावरे आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी गोठ्यातील आणि जंगलमय भागातील असे एकूण १० बैल, १५ गायी आणि ४ वासरे अशा सर्व २९ गोवंश जनावरांची तात्काळ सुटका केली. या जनावरांना ताब्यात घेऊन सुरक्षितपणे गोशाळेमध्ये जमा करण्यात आले आहे.
या घटनेच्या अनुषंगाने, आरोपी हानीफ शेख अली मालवणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह त्याचा मुलगा आणि भाऊ अशा तिन्ही आरोपींविरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली. यामध्ये पो.उ.नि. श्री. राजकुमार यादव, पो.उ.नि. श्री. महेश पाटील, पो.उ.नि. श्री हेमराज निर्मळ, पो.उ.नि. श्री मिलिंद चव्हाण तसेच पोलीस अंमलदार श्री. अभिजीत पवार, श्रीमती. रुपा ढोले, श्रीमती. साक्षी गुजर, श्री. विकास पवार, श्री. विजयंन सातारडेकर, श्री. सुरज मोरे, श्री. विशाल कदम, श्री. निलेश जाधव आणि श्री. अतुल सापते यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या कारवाईमुळे गोवंश हत्या थांबवण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे.













