दारूच्या नशेत चिरेखणीत पडून व्यक्तीचा मृत्यू; रत्नागिरीतील वेतोशी येथील घटना

रत्नागिरी : वेतोशी येथील विकास पाटील यांच्या चिरेखणीत (दगडांच्या खाणीत) दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ०७ जून रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी घडली. राजशेखर शरणप्पा गौडा बीरादर (वय ५०, रा. सापुचेतळे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्र. ४६/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजशेखर बीरादर हे जास्त दारू प्यायलेले असल्याने खबर देणाऱ्याने त्यांना पावस येथील घरी जाण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर ते घरी पोहोचले नाहीत. खबर देणाऱ्याने त्यांच्या ओळखीच्या लोकांकडे फोन करून चौकशी केली, परंतु त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

शनिवारी, ०७ जून रोजी राजशेखर यांचा निवळी येथे शोध घेत असताना, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रवी कोकरे यांनी खबर देणाऱ्याला वेतोशी येथील विकास पाटील यांच्या चिरेखणीवर एक व्यक्ती पडलेला असल्याचे सांगितले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, तो राजशेखर शरणप्पा गौडा बीरादर असल्याचे ओळखले.

प्राथमिक अंदाजानुसार, राजशेखर हे दारूच्या नशेत चिरेखणीच्या परिसरात फिरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते चिरेखणीत पडून मयत झाले असावेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी विसेरा (अंतर्गत अवयवांचे नमुने) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. दारूच्या अतिसेवनामुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 09-06-2025