चिपळूण : खेड तालुक्यातील अलसुरे-शिरीषकरवाडी येथील समाजमंदिराचे वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात नुकसान झाले. या समाजमंदिराच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी मिळावा, अशी मागणी रोहिदास समाजसेवा संघाचे अध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी अलसुरे शिरीषकरवाडी येथे समाजकल्याण विभागाच्या निधीतून समाजमंदिर बांधण्यात आले. या मंदिरात समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असत. गेल्या महिन्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसात समाजमंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कौलांचे छत कोसळले.
याची माहिती येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा केला असून या समाजमंदिराचे सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसात या समाजमंदिराच्या दुरुस्ती अथवा नवीन समाजमंदिर बांधकामासाठी निधी मंजूर व्हावा, अशी मागणी अलसुरे-शिरीषकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 09/Jun/2025














