दापोली : मुरुड समुद्रकिनारी मृत कासव ठेवले झाडाला टांगून

दापोली : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी कासवाला मारून झाडाला टांगून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मृत कासवाला दापोली येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आणून तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून त्याचे दहन केल्याची माहिती दापोली वनविभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

कांदळवन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर एका झाडाला पूर्ण वाढ झालेले मोठे (नर) कासव टांगून ठेवलेल्या स्थितीत आढळले आहे दापोली कांदळवन विभागाकडून आणि पशुवैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कासव २६ मेपूर्वी सुमारे पंधरा दिवस मृत झाले असावे आणि अनोळखीने त्याला झाडाला टांगून ठेवले असावे. त्याच्या शरीरातील सर्व मांसल भाग निघून गेला होता. फक्त पाठीचा कडक भाग शिल्लक राहिल्याचे पंचनामावेळी दिसून आले.

याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे; मात्र हे कासव मृत झाल्यानंतर कोणीतरी टांगून ठेवले असावे, असा निष्कर्ष कांदळवन विभागाने काढला आहे, अशी माहिती संबंधित विभागाने दिली. कासव मृतावस्थेत आढळले असताना त्याला झाडाला टांगून कोणी आणि का ठेवले, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

मांजर, कुत्रे किंवा एखादा पक्षी मृतावस्थेत आढळला तर त्याला पुरून टाकण्याची पद्धत आहे; मात्र या कासवाबाबत असे न होता झाडाला टांगून ठेवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दापोली तालुक्यात एक महिन्यापूर्वी टेटवली गावात मगर अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळली होती.

तालुक्यात माशांच्या उलटीची होणारी तस्करी, खवल्या मांजराची तस्करी, बिबट्यांच्या जीवावर बेतल्याच्या घटना, क्रूरपणे मगरीला जाळून मारल्याची घटना आणि आता कासवाला झाडाला टांगून ठेवल्याची घटना समोर आल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

वन्यप्राण्यांच्या जीवावर सातत्याने आघात होत असताना याच्यावर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. बेकायदेशीर वृक्षतोड, वन्यप्राणी हत्या कायदा कडक असून, त्याबाबतची जनजागृती आणि कडक अंमलबजावणी होणे अत्यावश्यक बाब आहे. वन्यप्राण्यांचा निसर्गातील साखळीमध्ये असलेला महत्त्वाचा सहभाग याबाबतची जाणीवजागृती प्रकर्षाने संबंधित विभागाने करणे अत्यावश्यक आहे-डॉ. प्रशांत परांजपे, पर्यावरण अभ्यासक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 09/Jun/2025