रत्नागिरी : तासाच्या हजेरीमुळे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणातील शिक्षक नाराज

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २ जूनपासून सुरू करण्यात आले आहे; परंतु हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे की कैद्यांसाठी? असा उद्विग्न सवाल शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. या प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांची दर तासाला उपस्थिती घेतली जात आहे. हा एकप्रकारे शिक्षकांवर दाखवलेला अविश्वास आहे. ते प्रथम थांबवावे, अशी मागणी कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केली आहे.

वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण राज्यात सर्वत्र सुरू आहे. रत्नागिरीत ते फाटक प्रशालेमध्ये घेतले जात आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ तिथे शिक्षकांना मार्गदर्शनासाठी येत आहेत.

यामध्ये सहभागी शिक्षकांची तासाला हजेरी घेतली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणस्थळी यायला पाच मिनिटे उशीर झाला तरीही संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. त्याबरोबरच प्रत्येक व्याख्यानानंतर ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकाकडून २ रुपये प्रवेशशुल्क घेण्यात आले आहे; परंतु त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत, असे तिथे उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

वास्तविक शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य सर्व विभागांना कोणत्याही सेवांतर्गत प्रशिक्षणाशिवाय कालबद्ध पदोन्नतीचा (१०-२०-३०) लाभ दिला जातो. शिक्षण विभागासाठी वरिष्ठ व निवड श्रेणी मिळवण्यासाठी जटील अटी आहेत. त्यात भर म्हणून यावर्षी अमानवी पद्धतीने प्रशिक्षण घेतले जात आहे. या सर्व अमानवी पद्धती बंद करून पूर्वीप्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे, अशी मागणी कोकण विभागीय शिक्षक लोकशाही अघाडी (टीडीएफ) व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात येत असल्याचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

वागणूक अयोग्य
शिक्षणक्षेत्र शिक्षकांच्या योगदानावर टिकून आहे. महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देशातील प्रगत राज्य आहे. असे असतानाही राज्याचा शिक्षण विभाग व उच्चपदस्थ अधिकारी शिक्षकांना प्रशिक्षणावेळी अशी वागणूक देत असतील तर ते अयोग्य आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 09/Jun/2025