Maharashtra Weather Update: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यात पुन्हा धो-धो बरसणार..

मुंबई : पदार्पणातच दोन-चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम ‘बॅड पॅच’ आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे.

२६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला.

१३ जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून रुतून बसलेला मान्सून खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यांत पोहोचू शकला नाही.

निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे.

त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही. पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे. मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे, असे अभ्यासकांना वाटते.

राज्यात कुठे, काय शक्यता?
९ जूनला मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नंतर १० ते १२ जूनदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल. १२ जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

१२४ वर्षांतील सर्वांत ओला महिना
मे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले होते. मे महिन्यात १२४ वर्षात प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला.

शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर १५ जूननंतर चांगल्या वाफशावर पेरणीचा निर्णय घ्यावा. – माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 09-06-2025