उद्धव ठाकरेंचे आजही मला फोन येतात; संजय राठोडांचा खळबळजनक दावा

नांदेड : संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी माझे आजही चांगले संबंध, त्यांचे आजही मला फोन येतात, असा खळबळजनक दावा राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणी गंभीर आरोप झाल्यानंतर राजीनामा घेण्यात आला होता. त्यावेळी, मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. त्यामुळे, शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर संजय राठोड यांनी आपली नाराजी दर्शवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर, उदयास आलेल्या महायुतीमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदही मिळाले. मात्र, शिवसेना शिंदे गटात गेल्यापासून उद्धव ठाकरेंशी आमदारांचा संवाद संपुष्टात आल्याचं दिसून आलं. मात्र, संजय राठोड यांनी आज खळबळजनक दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना त्यांच्या प्रगतीचे पुस्तक जाहीर केले. त्यात, संजय राठोड हे नापास असल्याचे सांगण्यात आले, त्यावरुन मंत्री राठोड चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट झालं. मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास दाखवले. पण, मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाहीत, मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये संवाद मेळाव्यात बोलताना केले. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत राठोड यांनी बंजारा भाषेत तुफान फटकेबाजी केली. मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितले, संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात, असा खळबळजनक दावाही संजय राठोड यांनी पुढे बोलताना केला.

भाषणानंतर वक्तव्यावरुन घुमजाव

भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारले असता मात्र त्यांनी घुमजाव केले. मी असे बोललोच नाही, असे राठोड म्हणाले. मात्र, राठोड यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.

अखंड शिवसेनेचा नारा

दरम्यान, राज्यात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खासदार संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे, एकीकडे ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन कीर्तीकर यांनी अखंड शिवसेनेचा नारा दिला आहे. दोन ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावे, असे त्यांनी म्हटलं. त्यातच, आता संजय राठोड यांचे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 09-06-2025