रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात घराघरांमध्ये पाणी पुरवण्यासाठी केंद्र व राज्यशासनाची योजना राबवली जात आहे. जलजीवन मिशनला मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे अधिकचा कालावधी मिळणार आहे. जिल्ह्यात १ हजार ५३४ महसुली गावांपैकी मे २०२५ अखेरपर्यंत ५२३ गावे ‘हर घर जल” घोषित करण्यात आली आहेत; तर अजून १ हजार ११ गावे घोषित होणे बाकी आहे. ३४.०९ टक्के गावे ‘हर घर जल” म्हणून घोषित करण्यात आली.
जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या १ हजार ४३२ कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे ३०० कामे ५० टक्केही पूर्ण झालेली नाहीत. रखडलेली कामे दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण होत नसल्यामुळे शासनाने जलजीवन मिशनला मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे अधिकचा कालावधी मिळणार आहे. असे असले तरी ७६ कोटी रुपयांची गरज प्रशासनाला होती.
मे २०२५ अखेर जिल्ह्यात ३४.०९ टक्के गावे हर घर जल घोषित करण्यात आली आहेत. जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिह्यात १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी ४४६ कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण झालेली होती. त्यातील ३३८ योजना ७५ टक्के पूर्णच्या दरम्यान आहेत. ३४६ योजना ५० ते ७५ टक्के, १७५ योजना २५ ते ५० टक्के तर १२५ योजना ० ते २५ टक्क्याच्या दरम्यान प्रगतीवर होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र, या कालावधीत एकूण मंजूर योजनांचा अवधी ४० टक्केच योजना पूर्ण करता आल्या आहेत. केंद्र व राज्यशासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने कामे कमी वेगाने सुरू आहेत. एकूण योजनेसाठी सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये जिह्याला मिळणार आहेत.
काही योजनांचे साहित्य जागेवर येऊन पडले आहे; परंतु, ती कामे सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष कामे पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 09/Jun/2025














