राजापूर : राजापूर तालुक्यातील सागवे, नाखेरे येथील रस्ता कामाच्या उत्खननात सापडलेल्या तोफेची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी सागवे परिसरात जाऊन सापडलेल्या तोफेची पाहणी केली. या सापडलेल्या तोफेचे त्याच परिसरात जतन व्हावे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांची विशेष बैठक सागवे येथे आयोजित करण्याबाबतचे सूतोवाच अपूर्वा सामंत यांनी केले.
सागवे, नाखेरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान सुरू असलेल्या खोदकामात एक तोफ सापडली होती. ही तोफ शिवकालीन युगातील असल्याची चर्चादेखील सुरु होती. सागवे, नाखरे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलाशी संबंधित सरदार तेथे वास्तव्य करून होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या काळातील ती सापडलेली तोफ असावी, असा कयास व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या तोफेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आणि शुक्रवारी सागवे, नाखरे येथे भेट देवून तोफेची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे संघटक भरत लाड, शिवसेनेचे निरीक्षक संदेश पटेल, ओंकार पेडणेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी अपूर्वा सामंत यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणीदेखील केली.
यादरम्यान, खोदकामात सापडलेली तोफ हा ऐतिहासिक वारसा असून त्याचे त्याच भागात जतन झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठकीचे सागवे येथे आयोजन करून सापडलेल्या तोफेचे सन्मानाने जतन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.राजापूर तालुक्याला इतिहासकालीन वारसा लाभला आहे. ऐतिहासिक तालुका अशी ओळख आहे. त्या पार्श्वभूमीवर खोदकामात सापडलेल्या तोफेचे जतन त्याच परिसरात झाल्यास भविष्यात राजापूर तालुक्याची पर्यटनात्मकद़ृष्ट्या आणखी महत्त्व वाढणार आहे.
सागवे, नाखेरे परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याकाळी प्रसिद्ध बंदर या परिसरात होते. मोठमोठी जहाजे या बंदरात लागत असत. त्यामुळे ही सापडलेली तोफ पाहता या परिसरात आणखी ऐतिहासिक ठेवा सापडू शकतो, त्याचा विचार करून पुरातत्त्व विभागाने या परिसरावर खास लक्ष केंद्रित करून सर्वेक्षण करावे व आवश्यकतेनुसार उत्खनन करावे. – संदेश पटेल, शिवसेना निरीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 09-06-2025














