कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा डंका! प्रसाद देवस्थळी आणि डॉ. तेजानंद गणपत्ये यांची ऐतिहासिक कामगिरी, रत्नागिरीत जंगी स्वागताची तयारी

रत्नागिरी, ०९ जून २०२५ : दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी करत आपला झेंडा रोवला आहे. रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणमधील डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी रविवारी (८ जून २०२५) या ९० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये साधारण ११ तास ३० मिनिटांत आपले लक्ष्य पूर्ण केले. या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, प्रसाद देवस्थळी यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीत जंगी तयारी सुरू आहे.

कॉम्प्रिड्स मॅरेथॉनमधील विक्रमी कामगिरी

जगातील सर्वात जुनी, प्रसिद्ध आणि नामांकित अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स मॅरेथॉनचे यंदा ९८ वे वर्ष होते. या मॅरेथॉनमध्ये दक्षिण आफ्रिकेतील पिटर्समारीबर्ग ते डरबन असे ९० किलोमीटरचे अंतर १२ तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करायचे असते. ५ अंश सेल्सिअस ते २२ अंश सेल्सिअस अशा विषम हवामानाचा आणि अनेक चढ-उतार व अडथळ्यांचा सामना करत देवस्थळी आणि डॉ. गणपत्ये यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. डॉ. गणपत्ये यांनी यापूर्वी दोनदा ‘लोहपुरुष’ (Ironman) आणि सायकलिंगमध्ये ‘एसआर’ (Super Randonneur) असे किताब पटकावले आहेत, ज्यामुळे त्यांची ही कामगिरी अधिकच लक्षवेधी ठरली आहे.

‘धावनगरी रत्नागिरी’ची ओळख वाढवणारे प्रसाद देवस्थळी

‘धावनगरी रत्नागिरी’ अशी ओळख निर्माण करणारे प्रसाद देवस्थळी हे केवळ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजक नाहीत, तर ते स्वतः देशभरातील विविध मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सक्रियपणे धावतात. कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये त्यांनी प्रथमच सहभाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश मिळवले. स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यांचे लाईव्ह लोकेशन अनेक जण पाहत होते आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संस्थापक, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे यशस्वी आयोजक म्हणूनही देवस्थळी परिचित आहेत.

रत्नागिरीत जंगी स्वागताची तयारी

धामापूर तर्फे संगमेश्वर गावचे सुपुत्र असलेले प्रसाद देवस्थळी १३ जून रोजी भारतात परतल्यानंतर रत्नागिरीत दाखल होतील. रत्नागिरी शहरातून कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारे ते बहुदा पहिलेच धावपटू असल्याने, रत्नागिरीकरांकडून त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सुवर्णसूर्य फाऊंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनच्या संघासोबतच रत्नागिरीतील अनेक धावपटू व क्रीडाप्रेमी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. या नागरी सत्कार सोहळ्यात रत्नागिरीचा धावपटू म्हणून त्यांचा गौरव केला जाणार आहे.

या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, तरुणाईला क्रीडा क्षेत्रात पुढे येण्याची प्रेरणा मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:41 09-06-2025