राजापुरात आठवडा बाजारातील नियम धाब्यावर

राजापूर : शहरात दर आठवड्याला भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी घाटमाथ्यावरून येणारे व्यापारी वाहतुकीच्या नियमांसह नगरपालिकेने आखून दिलेले क्षेत्रही धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे आठवडा बाजाराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा नाहक त्रास राजापूर शहरवासियांबरोबर बाजारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांनाही होत आहे.

राजापूर शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार दिवसेंदिवस अस्ताव्यस्त होत चालला आहे. यावर राजापूर नगर पालिकेचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. आठवडा बाजारासाठी परजिल्ह्यातून येणारे व्यापारी वाटेल तसे आणि वाटेल तिथे आपली दुकाने थाटत असल्याने शहरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही व्यापारी तर नागरिकांच्या घराच्या दारासमोर रस्त्यावर आपली दुकाने थाटत असल्याने नागरिकांनी घरात जावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्वी बंदरधक्का परिसरापुरता मर्यादित असणारा आठवडा बाजार आता वैशंपायन पुलाअगोदरपासून अगदी नवजीवन हायस्कूलपर्यंत पसरल्याने आता आठवडा बाजाराला बकाल स्वरूप आले आहे. आठवडा बाजारासाठी घाटमाथ्यावरून येणारे व्यापारी चक्क ट्रक वा अन्य वाहने रस्त्यात उभे करून मालाची विक्री करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न जटिल बनला आहे. शहरात आधीच पार्किंगची पुरेशी जागा नसताना हे आठवडा बाजारातील व्यापारी वाहने अस्ताव्यस्त लावतात. त्यामुळे चालायलाही त्रास होतो.

आठवडा बाजारात यापूर्वी नगरपालिकेने आखून दिलेल्या ठिकाणी व्यापारी दुकाने मांडत होते. त्यामुळे एकाच ठिकाणी एकाच प्रकारची दुकाने असल्याने खरेदी करणे अधिक सोयीचे होत होते. आता विखुरलेली दुकाने असल्याने संपूर्ण आठवडा बाजार दुकाने शोधत फिरावे लागते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आठवडा बाजाराची व्यवस्था व्हावी. – मनोहर गुरव, ग्रामस्थ, राजापूर

आठवडा बाजारामध्ये सध्या विस्कळीतपणे दुकाने मांडली जात आहेत, त्याला शिस्त लागावी म्हणून लवकरच योग्य उपाययोजना केल्या जातील – जितेंद्र जाधव, मुख्यलिपिक, राजापूर नगरपालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 09/Jun/2025