रत्नागिरी : उन्हाळ्याच्या सुट्टया संपवून नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली असून, रत्नागिरी जिल्ह्यात दि. १६ जून रोजी शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी उघडणार आहेत. या पार्श्वभूमीवर, १६ ते ३० जून या कालावधीत जिल्ह्यात ‘शाळा प्रवेशोत्सव’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यावर्षी सुमारे १० हजार लहान मुले इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणार असून, त्यांच्यासह ६ ते १४ वयोगटांतील सर्व मुलांना, विशेषतः दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रशासनाचा ठाम निर्धार आहे.
उत्साहपूर्ण स्वागताची तयारी
नव्याने शाळेत येणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील १०० निवडक शाळांना लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी भेट देणार आहेत. या उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहपूर्ण, चैतन्यमयी आणि आनंददायी वातावरणात होईल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने वा कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन केले आहे.
शाळास्तरावर विविध उपक्रम जनजागृती आणि गृहभेटीः शाळा सुरू होण्यापूर्वी गावात ‘दवंडी’ देऊन प्रवेशासाठी आवाहन केले जाईल. तसेच, शिक्षकांमार्फत गृहभेटी देऊन पालकांशी संवाद साधला जाईल.
स्वच्छता आणि सजावट : शालेय परिसर स्वच्छ करून आकर्षक रांगोळ्या काढण्यात येतील. शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गखोल्या आणि परिसर सजवून तोरणे बांधली जातील. पारंपरिक स्वागतः नवागत विद्यार्थ्यांचे गावातील लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने, पुष्पगुच्छ देऊन आणि वाद्यांच्या गजरात स्वागत केले जाईल. मुलांना गोड खाऊचे वाटप करून त्यांच्या मनात शाळेविषयी ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
विशेष गरजा असणाऱ्या मुलांवर लक्षः दाखलपात्र मुलांच्या याद्या शाळा फलकावर, ग्रामपंचायत कार्यालयात आणि गावातील प्रमुख चौकांत लावण्यात येणार आहेत. विशेष गरजा असणाऱ्या प्रत्येक बालकास शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
पुस्तक दिन
शाळेचा पहिला दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. तसेच, शाळेच्या प्रथम दिवशी माध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांना प्रत्येकी दोन शाळा दत्तक शाळा म्हणून देण्यात आलेल्या आहेत.
गुणवत्ता आणि सुविधांवर भर
प्रवेशोत्सवाबरोबरच वर्षभरात शाळांना वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची स्थिती आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित केले जाईल. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकाही शाळा सुरू होण्यापूर्वी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 09/Jun/2025














