दापोली : कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन ९,१० व ११ जून रोजी दापोली तालुक्यात येणार आहे.
ग्रामीण दुर्गम भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे वेळेवर निदान होऊन अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल. या व्हॅनमध्ये तपासणी करताना स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग यावर अधिक भर असणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांनी केले आहे.
या व्हॅन सोबत दंतशल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत मार्फत व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ही व्हॅन ९ रोजी उपजिल्हा रुग्णालय दापोली, १० रोजी प्रा. आ. केंद्र आसूद व ११ रोजी प्रा. आ. केंद्र पिसई येथे येणार आहे.
तरी नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 09/Jun/2025














