रत्नागिरी : ‘फूड क्वीन’ मांडवी एक्स्प्रेस झाली २६ वर्षांची !

रत्नागिरी : कोकणवासीयांची लाडकी तसेच रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई- मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.

तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्स्प्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने धावत असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्स्प्रेसने लावली.

रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेसच्या २६ वा वाढदिवस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवारी ७ जून २०२५ रोजी रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.

लाडक्या मांडवीच्या २६व्या वाढदिवशी पारंपरिक व मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.

यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यासाठी श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, नीलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले.

रात्रभर जागून सजवली ट्रेन !
कोकणातून धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्या नंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 09/Jun/2025