Mumbai Train Accident : मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर आली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारुन जात असताना हा अपघात झाला.
या घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांनी रेल्वे अपघातावर संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी ‘रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, रेल्वेमंत्र्यांना तिथं जाऊन परिस्थिती बघू द्या’, असं म्हटले. केंद्र सरकारने रेल्वेकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला ठाकरे यांनी यावेळी दिला.
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, मुंबईमध्येरेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईमधील रेल्वे कशी चालते हे जगाला आश्चर्य आहे, अशी प्रतिक्रिया देत ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मुंबईमध्ये हा विषय फक्त रेल्वेसाठी मर्यादीत नाही, मुंबईमध्ये नीट रस्ते नाहीत. पार्किंग व्यवस्था नाही. शहराचा पूर्ण विचका झाला आहे. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
“मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे, कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
‘रेल्वेमंत्र्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी’
राज ठाकरे म्हणाले, मी रेल्वेने प्रवास केला आहे,यामुळे मला प्रवास माहित आहे. त्यावेळी गर्दी कमी असायची. आता मुंबईमधील मेट्रोमध्ये रात्री शिरून दाखवा. आज ज्या ठिकाणी अपघात झालाय तो काय नवा नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 09-06-2025














