रत्नागिरी : मिऱ्या एमआयडीसी जमीन दर दोन दिवसात ठरणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या एमआयडीसीच्या समर्थनाचा दूसरा भाग जमिनीचा दर समजल्यानंतरच सुरू होणार आहे. मिऱ्या गावामध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी खासगी जमिनी अधिग्रहणाच्या नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विरोध सुरू झाला. परंतु, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत्या दोन-तीन दिवसातच अधिग्रहित करायच्या जमिनीचा दर जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी ही एमआयडीसी रद्द झाली तर त्याचेही श्रेय पालकमंत्र्यांनाच मिळाले पाहिजे, अशी इच्छा एमआयडीसीचे समर्थक असलेल्या भूधारकांकडूनच एका बैठकीत घेण्यात आली.

मिऱ्या गावात उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून लॉजिस्टिक पार्क सुरू करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक पावले उचलली. त्यातूनच या एमआयडीसीसाठी भूधारकांना जमिन अधिग्रहणाच्या नोटीस देण्यात आल्या. त्यानंतर या एमआयडीसीला विरोध करणारी एक बाजू पुढे आली.

मिऱ्या गावातील ज्या भूधारकांच्या जागा एमआयडीसीसाठी जाणार आहेत त्यातील अनेक जागा मालकांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीत असताना त्यांची रात्री उशीरा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी ही एमआयडीसी जागा मालकांना नको असेल तर ती रद्द करतो असे सांगितले.

दरम्यान, एका जमिनदाराला रद्द व्हावी, असे वाटत असेल तर ते होवू देणार नाही, असा आक्रमक पवित्राही पालकमंत्र्यांनी घेतला होता. उपस्थित असलेल्या जागा मालकांनी पालकमंत्र्यांना आधी जमिनीचे दर जाहीर झाल्यास बरे होईल, अशी बाजू मांडली. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

येत्या दोन-तीन दिवसातच हे दर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळणाऱ्या दराचे समाधान झाले तर एमआयडीसी समर्थक जागा मालकच पुढे येवून आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या जमिन मालकांनी एमआयडीसी रद्द झाली तरी त्याचे श्रेय विरोधकांना घेवू देवू नका. ही एमआयडीसी तुम्हीच रद्द करा, असा सल्लाही दिला. या बैठकीला महसूलसह एमआयडीसीचे अधिकारीही उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 14/Oct/2024