सावर्डे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: ७४ लाखांचे चोरीस गेलेले ४५० वीजेचे खांब ट्रेलरसह हस्तगत, तिघे अटकेत!

रत्नागिरी : सावर्डे पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा छडा लावत ७४ लाखांपेक्षा जास्त किमतीचे ४५० लोखंडी इलेक्ट्रिक खांब (पोल) यशस्वीरित्या हस्तगत केले आहेत. या प्रकरणी राजस्थानमधील तीन ट्रेलर चालकांना अटक करण्यात आली असून, हा मुद्देमाल जवळपास ₹१.३४ कोटींपेक्षा जास्त किमतीचा असल्याचे समोर आले आहे.

सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात, सावर्डे महावितरण सब स्टेशनच्या शेजारील श्री. सचिन वारे यांच्या वहाळ फाटा येथील मोकळ्या जमिनीमध्ये ठेवलेले ४५० लोखंडी इलेक्ट्रिक खांब चोरीस गेले होते. या खांबांची किंमत ₹७४,८४,०९८/- एवढी होती.

या प्रकरणातील फिर्यादी, श्री. अखिलेष कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७, मूळ रा. विरार, पालघर, सध्या रा. भरणेनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्या संमतीशिवाय हे खांब ट्रेलरमधून चोरून नेण्यात आले होते. फिर्याद दाखल होताच सावर्डे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

तपासाची चक्रे फिरली, आरोपी जाळ्यात!
पोलिसांनी या ट्रेलरचा कसून शोध घेतला असता, गुन्ह्यात वापरलेले दोन ट्रेलर रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे आणि एक ट्रेलर कामथे येथे मिळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तीनही ट्रेलर चालकांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अशी आहेत:

१. सुरेश नंदलाल खारोल (वय २४, रा. जोताया, जि. अजमेर, राजस्थान)
२. पिंटु भना (वय २२, रा. कैसरपुरा, जि. अजमेर, राजस्थान)
३. पुखराज श्रीकिशन भील (वय २२, रा. सुरजपुरा, जि. अजमेर, राजस्थान)

या तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले ४५० लोखंडी इलेक्ट्रिक खांब ट्रेलरसह जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत आता ₹१,३४,२४,५८९/- एवढी झाली आहे.

पोलीस कोठडी आणि पुढील तपास
अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपी चालकांना मान. न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात सावर्डे पोलिसांनी १००% मुद्देमाल हस्तगत करून एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

हा संपूर्ण तपास मान. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मान. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण उपविभाग श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आबासो पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा तपास यशस्वी केला. या टीममध्ये खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश होता:

पो.उप.नि. श्री. गमरे, पो.हवा/४७८ श्री. साळुंखे, पो.हवा/८६२ श्री. कांबळे, पो.हवा/६७२ श्री. कोळेकर, म.पो.हवा/१४१८ श्रीमती. कान्हेरे, पो.हवा/९५५ श्री. कांबळे, पो.शि/५५१ श्री. भांगरे, पो.शि/३१९ श्री. जड्यार, म.पो.कों/३०७ श्रीमती. मुंढे, म.पो.कॉ/२३३ श्रीमती. जाधव, पो.कों/२७७ श्री. चव्हाण, पो.कॉ/२४९ श्री. साठे
या कारवाईमुळे सावर्डे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि चोख तपासाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. या घटनेमुळे परिसरात एक चांगला संदेश गेला आहे की, गुन्हेगार कितीही लांब पळून गेले तरी पोलीस त्यांना शोधून काढतील.