रत्नागिरीत धक्कादायक चोरी : मित्रानेच पळवले साडेसात लाख रुपये!

रत्नागिरी, (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरातून एका धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. आसीफ मोटलानी यांच्याकडे भाड्याने राहत असलेल्या घरातून, मित्रानेच आपल्या मित्राचे साडेसात लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार मोहम्मद आलम समसाद खान (वय २७) यांनी दिली आहे. ही घटना १ जून २०२५ रोजी सकाळी ५ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद आलम समसाद खान आणि आरोपी प्रदीपसिंग मलखामसिंग यादव हे दोघे कीर्तीनगर येथील एकाच घरात भाड्याने राहत होते. १ जून रोजी मोहम्मद खान यांच्या नकळत प्रदीपसिंग यादव याने त्यांच्याकडील रोख रक्कम आणि ती ठेवलेली बॅग चोरून नेली. फिर्यादी मोहम्मद खान यांना खात्री पटल्यानंतर, त्यांनी ९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी गु.र.नं. २४५/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी प्रदीपसिंग यादव याचा शोध सुरू केला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. मित्रानेच मित्राची लाखोंची रक्कम पळवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 10-06-2025