रत्नागिरी, ग्रामीण: रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घरकाम करणाऱ्या एका महिलेची पर्स चोरट्याने लंपास केली आहे. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २,२५,८०० रुपयांचा ऐवज होता. ही घटना ५ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० ते २.३० वाजेच्या दरम्यान गणेश जोगळेकर यांच्या घराजवळ, किचनच्या बाहेर उघड्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ५ जून रोजी दुपारी ११.५० वाजता गणेश जोगळेकर यांच्या घरी घरकाम करण्यासाठी गेली होती. त्यांनी आपली पर्स जोगळेकर यांच्या घराच्या किचनच्या बाहेरील बाजूला असलेल्या लोखंडी हुकाला अडकवून ठेवली होती. याच दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती पर्स चोरून नेली.
चोरट्याने पळवलेल्या मुद्देमालामध्ये १५,००० रुपये रोख रक्कम, ६०,००० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १,२०,००० रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे तीन सर असलेले सोन्याचे मोठे मंगळसूत्र, १५,००० रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे सरगम कानातले, १५,००० रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानचैन पट्ट्या, आणि ८०० रुपये किमतीची सोन्याची नाकातली नथ यांचा समावेश आहे. याशिवाय, विदर्भ बँकेचे पासबुक, स्टेट बँक हातखंबा पासबुक, आधारकार्ड आणि इलेक्शन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रेही पर्समध्ये होती.
याप्रकरणी ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून २१ मिनिटांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. ११४/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 10-06-2025














