चिपळूणमध्ये पोलीस ठाण्यासमोरच महिलेला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल

रत्नागिरी, चिपळूण: चिपळूण पोलीस ठाण्यासमोरच एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ९ जून २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्यासमोर, श्रीकृपा स्नॅक्स सेंटरच्या बाजूला घडली. याप्रकरणी पोलिसांनी श्रीकांत कांबळे (रा. चिपळूण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला त्यांचे पती निलेश रघुनाथ कदम, नणंद आणि आरोपी श्रीकांत कांबळे यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यासाठी चिपळूण पोलीस ठाण्यात आल्या होत्या. अर्ज देऊन त्या पोलीस ठाण्याबाहेर पडल्या आणि साक्षीदारांच्या गाडीत बसत असताना, गाडीशेजारी उभा असलेल्या आरोपी श्रीकांत कांबळे याने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

जेव्हा फिर्यादी महिलेने त्याला शिवीगाळ न करण्यास सांगितले, तेव्हा त्याला राग आला. त्याने साक्षीदारांसमोरच महिलेच्या कानाखाली चापड मारली. एवढेच नाही, तर त्याने महिलेच्या शरीराला चुकीचा स्पर्श करून मनाला लज्जा उत्पन्न केली आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार महिलेने दिली आहे.

या घटनेची नोंद ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी गु.र.नं. १३५/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ७४, ७९, ११५(२), ३५२ प्रमाणे श्रीकांत कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 10-06-2025