रत्नागिरी, चिपळूण: चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील अलोरे एस.टी. स्टॉपजवळ, चिपळूण-कराड रोडवर एका मिडी बस चालकाने वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यातच बस उभी करून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश भागवत नाळे (पोहेकॉ/७११) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनोद आत्माराम उकरे (वय ४२) या आरोपीने आपली सफेद रंगाची मिडी बस (क्र. MH12/WJ/4460) रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता, तसेच पादचाऱ्यांनाही धोका निर्माण झाला होता. आरोपी आपली बस रस्त्यात उभी करून कोठेतरी निघून गेला होता.
या घटनेची नोंद ९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी गु.र.नं. १३४/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे विनोद आत्माराम उकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 10-06-2025









