राजापूरमध्ये अर्जुना नदीकिनारी गावठी दारूविक्री करणाऱ्याला अटक!

रत्नागिरी, राजापूर: राजापूर तालुक्यातील रहाटाकोंड येथे अर्जुना नदीच्या पात्राशेजारी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ७५० रुपये किमतीची ७ लीटर गावठी दारू जप्त केली आहे.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण ज्ञानदेव कात्रे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र नारायण गांगण (वय ४७) हा रहाटाकोंड येथील अर्जुना नदीच्या पात्राजवळ एका आकेशीच्या झाडाच्या आडोशाला बेकायदेशीरपणे दारूची विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याला रंगेहाथ पकडले.

या घटनेची नोंद ९ जून २०२५ रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांनी करण्यात आली आहे. राजापूर पोलिसांनी गु.र.नं. ११४/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार सुरेंद्र नारायण गांगण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-06-2025