रत्नागिरी, (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यातील असगोली येथील गौरव अरुण पवार (वय ३९) या तरुणाचा राहत्या घराच्या टेरेसवरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजता अपरांत हॉस्पिटलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पवार १८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
अपरांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती ३१ मे २०२५ रोजीच चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. चिपळूण पोलिसांनी अ.मृ.रजि.नं. ००/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
चिपळूण पोलीस ठाण्यातून या आकस्मिक मृत्यूची कागदपत्रे ९ जून २०२५ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली आहेत. त्यानुसार, गुहागर पोलिसांनी आमृ. क्रमांक १६/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे या घटनेची नोंद घेतली आहे. या घटनेमुळे असगोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 10-06-2025














