Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पक्षाच्या वर्धापन दिनीच मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष पदाची सात वर्षे संधी दिली असं जयंत पाटील म्हणाले. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली.
“मला शरद पवार यांनी बरीच संधी दिली. प्रदेशाध्यक्ष पदाचा सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या देखत मी शरद पवार यांना विनंती करतो,” असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. त्यामुळे जयंत पाटील यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.
यावेळी शेवटी पक्ष शरद पवार यांचा आहे, त्यामुळे शरद पवार यांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, कारण आपल्याला अजून परत पुढे जायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
“एकेकाळी भाजपचे दोनच खासदार निवडून आले होते. आज तो देशातील मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळे घाबरु नका. आपण सगळे ताकदीने कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे हे कधीही विसरु नका. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत,” असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 10-06-2025














