Supriya Sule : आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होतो… सहन करायला शिक; सुप्रिया सुळेंच्या स्टेटसमागे काय राजकारण?

पुणे : पवार कुटुंबीय आणि राजकारण हे घट्ट नातं, ते आतापर्यंत तरी कुणाला वेगळं करता आलं नाही. जिथे राजकारणाचा विषय असतो तिथे पवार कुटुंबीय कधीही भावनिक होत नाही. शरद पवारांच्या राजकारणात हे आतापर्यंत दिसून आलं आणि नंतर अजितदादांच्या राजकारणातही तेच दिसून आलं.

भावनिकतेपेक्षा व्यवहारिकतेला प्राधान्य पवारांनी नेहमीच दिलं. पण सुप्रिया सुळे त्याला काहीशा अपवाद ठरतात की काय अशी शंका अनेकांच्या मनात येते. त्याला कारणही तसंच आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅपला ठेवलेल्या स्टेटसची चर्चा जोरदार सुरू आहे. ‘आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक’ असं सुप्रिया सुळेंनी त्यात म्हटलंय. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

‘आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो. त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही’ असं सुप्रिया सुळे म्हणतात. त्यामुळे घट्ट व्हायचं आणि सहन करायचं असंही सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसमध्ये म्हटलंय. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्याआधी सुप्रिया सुळेंनी हे स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंना नेमकं काय म्हणायचं आहे याचे अर्थही लावले जात आहेत.

Supriya Sule WhatsApp Status : सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्स अॅप स्टेटसमध्ये नेमकं काय म्हटलंय?

सहन करायला शिक. आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करु शकत नाही. परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं. कर्तव्य करत राहायचं. आपले संस्कार कधीही विसरायचे नाही.

आईला सगळंच माहिती असते…
माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात…
आईने मला जो सल्ला दिला, तिच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते… सहन करायला शिक

Supriya Sule Emotional Post : स्टेटसमागे काहीतरी राजकारण?

‘आपली बाजू सत्य असली तरी घट्ट व्हायचं आणि सहन करायचं’ असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे? अजितदादांना उद्देशून त्यांनी काय म्हटलंय का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे.

महत्त्वाचं म्हणजे 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा 26 वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे हा वर्धापनदिन वेगवेगळे साजरे करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी भावनिक स्टेटस ठेवलं आहे. त्याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बारामतीचे पवार कुटुंबीय सहसा भावनिक होत नाही, सार्वजनिकरित्या तर कधीच होत नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी जरी भावनिक स्टेटस ठेवले असले तरी त्यामागे काहीतरी राजकारण नक्कीच असेल अशी चर्चा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 10-06-2025