फ्लॅटला आग, बापाची दोन मुलांसह खिडकीतून उडी, तिघांचाही मृत्यू

Delhi Fire : दिल्लीतील द्वारका परिसरात एका बहुमजली इमारतीला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीच्या विळख्यात काही कुटुंबं सापडली. दरम्यान, आगीपासून बचाव करण्यासाठी एका कुटुंबातील काही जणांनी वरून खाली उड्या मारल्या.

यात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने या आगीबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका सेक्टर-१३ मधील एका इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या आठ वाहनांनी आग शमवण्याचं काम सुरू केलं. मात्र ही आग एवढी भयानक होती की, त्यामध्ये संपूर्ण इमारत वेढली गेली.

या आगीच्या विळख्यात सापडल्याचं पाहिल्यानंतर सातव्या मजल्यावर राहणारं एक कुटुंब घाबरलं. या कुटुंबातील भाऊ-बहीण आणि वडिलांनी सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यश यादव असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव आहे. ते पेशाने व्यावसायिक होते. या आगीमधून यश यादव यांची पत्नी आणि मोठा मुलगा मात्र सुदैवाने बचावले. त्यांना अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 10-06-2025