तब्बल ३३ वर्षानंतर भेटले पन्नाशीतले वर्गमित्र; रमले शेला-पागोट्यात; बळवंतराव झेले हायस्कूल ‘दहावी १९९२’ बॕचचे स्नेहमिलन

जयसिंगपूर, दि. १० – तब्बल ३३ वर्षानंतर पन्नाशीत असणारे १२१ शालेय वर्गमित्र-मैत्रिणी नुकतेच एकत्र भेटले. अन् रमले शेला-पागोट्यात, किस्स्यांत, आठवणीत. निमित्त होतं बळवंतराव झेले हायस्कूलच्या ‘दहावी १९९२’ बॕचचे स्नेहमिलन.!

तामिळनाडूतील सेलम, मुंबई, पुणे, बेळगाव अशासह जयसिंगपूर आणि ग्रामीण भागातून सर्वजण खास उपस्थित राहिले होते. ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि जिच्या छत्रछायेत शिकायला मिळाले, अशा गुरुजन आणि शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, शालेय वर्गमित्रांविषयीची ओढ यातून हा स्नेहमेळावा निर्मल पोरवाल, विनय कदम, सचिन पाटील, सचिन रुग्गे, विजय देसाई आदींच्या प्रमुख पुढाकाराने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

तत्कालीन शिक्षक ए ए ढोले, एस आर पाटील, अशोक शिरगुप्पे, शिक्षकेत्तर कर्मचारी आप्पासाहेब आईंगळे मुख्याध्यापक सुभाष मुरगुंडे यांचे औक्षण करुन, हलगी वादनात स्वागत करण्यात आले. दारात सुंदर रांगोळी काढण्यात आलेली.

बालपणीची आठवण म्हणून लेमणगोळ्या, पानगोळ्या, चिंचगोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्यांचे विशेष वाटप करण्यात येत होते.

डाॕ स्नेहल चिप्परगे, जितेंद्र कांबळे, विनोद डोईजड, उल्हास कांबळे यांनी शेला-पागोट्यांचे वाचन केले. ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..’ या कवितेचे वाचन करुन मनिषा घेवारी हिने दिवंगत शिक्षक, वर्ग मित्र-मैत्रिणींना आदरांजली वाहिली.

आजच्या या भेटीतून जुन्या आठवणींचा सुगंध दरवळतोय. शाळा ही संस्कारभूमी! याच मातीत हसलो-रडलो, खेळलो बागडलो, शिकलो-धडपडलो, रुसलो-फुगलो-भांडलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून घडलो, असे प्रमुख मनोगत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले.

आयुष्यात सर, साहेब म्हणणारे खूप भेटले. पण, ‘नान्या’ म्हणून हाक मारणारे मित्र इथे शाळेतच भेटले. या आपुलकीच्या हाकेचे समाधान मित्रांच्या बोलवण्यातच आहे. मुर्खापासून विद्वानांपर्यंत पोहचविण्याची जी पायरी होती, ती सुरु झाली झेले हायस्कूलमधून! खरी उभारी आणि मार्ग दिला तो शाळेने, अशी भावना ए टी शहा माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय ठाणे चे सहयोगी प्राध्यापक समिर नानिवडेकर यांनी व्यक्त केली.

सत्याच्या खांद्यावर स्वप्नाला बसूनच आभाळाला गवसणी घालता येते, असे मत रुपक कथामधून वसुधा जाधव यांनी मांडले.
शाळेतील विविध स्पर्धांमुळेच आयुष्यातील स्पर्धेत यशस्वी ठरल्याचे, मनिषा तवटे यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

प्रशांत मगदूम, संजय जिरगे, राजू भोसले, नबिसो मुल्ला यांनी गायन तार शशिकांत हंकारे, डाॕ स्नेहल चिप्परगे, किरण शिंदे यांनी नृत्यातून धमाल केली.

डाॕ अमित पुदाले, डाॕ सचिन पाटील, दीपाली हंजे, संजय जिरगे, रफिक शेख, शेखर गंगधर, वैशाली कुंभार आदीसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 10-06-2025