पुणे : राष्ट्रवादीला (NCP) जनतेचा पाठिंबा मिळाला, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र येऊन पक्ष स्थापन केला. 26 वर्षे लोकांनी सेवेची संधी दिली, अनेकांना पक्षाने संधी दिली. कार्यकर्त्यांमुळे आज हा दिवस साजरा करण्याची संधी मिळत असल्याचे सांगत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी आयोजित सोहळ्यात भाषणाला जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शरद पवारांनी (Sharad pawar) राष्ट्रवादीच्या जडणघडणीतील सहकाऱ्यांच्या आठवणी काढत भविष्यातील पक्षाच्या वाटचालीवरही भाष्य केलं. तर, पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या देशातील व जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. यावेळी, पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra modi) अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही, असे पवारांनी म्हटले.
शरद पवारांनी पक्षाची वाटचाल सांगतान आर.आर. पाटील यांच्या आठवणी जागवल्या. आर.आर. पाटलांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट केले, आबा सामान्य कुटुंबातील होते. सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तृत्व दाखवू शकतो, ते महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी काम करत राहिले. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पुढे आला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम पक्षाने केलं. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांच्या कामामुळेच आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणार असून संधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात. येणाऱ्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना निवडून द्या, 2-3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. राष्ट्रहितात मी कधीच राजकारण आणत नाही. देशहितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली, असे शरद पवारांनी म्हटले.
भारताचं सर्वच शेजाऱ्यांशी वाकडं
चीनचा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय आहे. देशात एक काळ असा होता की, जवाहरलाल नेहरु यांचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही. देशाच नेतृत्व करणाऱ्यांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही, त्याचा परिणाम देश भोगतोय, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर टीका केली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डावे पक्ष असतील किंवा इतर पक्ष एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण केला पाहिजे. कोणी आले आणि गेले तरी फरक पडत नाही, आपण एकसंघ राहिलो तर सत्ता येते हा अनुभव आहे, असेही पवारांनी म्हटलं.
जयंत पाटलांच्या मागणीवर निर्णय घेऊ
राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं, कोण पक्षातून गेलं याची चिंता करू नका. सन 1980 नंतर आमची संख्या 6 वरून 72 झाली. जयंत पाटलांनी 10 वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं, विरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केलं. सत्ता येते जाते, पण पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास असल्याचे पवारांनी म्हटले. जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं. जयंत पाटील म्हणाले नवीन चेहऱ्यांना संधी द्या, जयंत पाटलांच्या मागणीवर प्रमुख सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असेही पवारांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 10-06-2025














