Breaking : उत्पन्न दाखल्यासाठी लाच घेणारा ग्राममहसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात! रत्नागिरीत कारवाई

रत्नागिरी : उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रत्नागिरीच्या केळशी सजा येथील ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. मंगळवार, १० जून २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली असून, उंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी रत्नागिरी युनिटला एका ४९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली होती की, त्यांचा उत्पन्नाचा दाखला मंजूर करण्यासाठी ग्राममहसूल अधिकारी राजेंद्र उंडे (सजा केळशी, अतिरिक्त कार्यभार मांदिवली) २० हजार रुपयांची लाच मागत आहे. ही तक्रार ५ जून २०२५ रोजी प्राप्त झाली होती. त्याच दिवशी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली आणि उंडे याने २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

आज, १० जून २०२५ रोजी पंचांसमक्ष ग्राममहसूल अधिकारी उंडे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

ही यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. या पथकात सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा संजय वाघाटे, पोहवा विशाल नलावडे, म पोहवा श्रेया विचारे, पोहवा दीपक आंबेकर, पोकॉ हेमंत पवार, पोकॉ राजेश गावकर, म पोकॉ समिता क्षीरसागर आणि चा पोना प्रशांत कांबळे यांचा समावेश होता.

ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. संजय गोवीलकर, मा. श्री. सुहास शिंदे आणि रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा. श्री अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

जनतेला आवाहन:
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंटने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाशी दूरध्वनी क्र. ०२३५२ २२२८९३ किंवा टोल फ्री क्रं. १०६४ वर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:47 10-06-2025