पुणे : कर्णधार अझीम काझी, धीरज फटांगरे व सत्यजीत बच्छाव यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावोर रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ६७ धावांनी पराभव केला. ७२ धावांची खेळी साकारणारा अझीम काझी सामन्याचा मानकरी ठरला.
पहिल्या तीन सामन्यांतील पराभवानंतर गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी संघाकडून रायगड संघासमोर १८८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना रायगड संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रत्नागिरीच्या प्रदीप दाढे, किरण चोरमले, प्रथमेश गावडे यांच्या भेदक माऱ्यापुढे ऋग्वेद मोरे (तीन धावा), सिद्धेश वीर (१८ धावा), दिग्विजय पाटील (सात धावा), हर्ष मोगवीरा (दोन धावा), ऋषभ राठोड (पाच धावा) हे वरच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
त्यामुळे रायगड संघ ७.१ षटकांत पाच बाद ३७ अशा बिकट स्थितीत होता. त्यानंतर नीरज जोशी (१९ धावा), रवींद्र जाधव (१२ धावा) यांची भागीदारी लयात येत असतानाच कर्णधार अझीमने फिरकीपटू सत्यजीत बच्चावला गोलंदाजीस आणले. सत्यजीतने नीरज जोशीला झेलबाद, तर रवींद्र जाधवला त्रिफळाचीत करून रायगड संघाचे आव्हान अधिक बिकट केले. साव्या गजराजने १६ धावा काढून थोडासा प्रतिकार केला. विशेष म्हणजे रत्नागिरीचा यष्टिरक्षक अभिषेक पवारने अप्रतिम चार झेल घेत संघाच्या विजयात हातभार लावला. रायगडचा संघ २० षटकांत नऊ बाद १२० धावाच करू शकला. रत्नागिरी संघाकडून प्रदीप दाढे, किरण चोरमले व प्रथमेश गावडे या आघाडीच्या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. त्यात फिरकीपटू सत्यजीत बच्चावचा मारा प्रभावी ठरला. त्याने १७ धावांत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रायगड संघाने नाणेफेक जिंकून रत्नागिरी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. अथर्व धर्माधिकारी २३ धावा काढून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. पॉवरप्लेमध्ये रत्नागिरी संघाच्या अथर्व धर्माधिकारी व धीरज फटांगरे या सलामी जोडीने ३६ चेंडूंत ५७ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. धीरज फटांगरेने झंझावती फलंदाजी केली. धीरजने ४३ चेंडूंत ५७ धावा करताना नेत्रदीपक फटकेबाजी केली. त्यात त्याने तीन चौकार व तीन षटकार फटकावले. अझीम काझीने आक्रमक फटकेबाजी करत २९ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले.
अझीमने धीरजच्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ४६ धावांची भागीदारी करून संघाची स्थिती अधिक भक्कम केली. ही भागीदारी रंगत असतानाच १४व्या षटकात रायगडच्या हितेश वाळुंजने रत्नागिरीच्या धीरजला झेलबाद केले. धीरजने कव्हर्सच्या दिशेने मारलेला चेंडू रवींद्र जाधवने अफलातून झेल घेऊन पकडला. एका बाजूने संघाची धुरा सांभाळताना अझीमने ३८ चेंडूंत सात चौकार व तीन षटकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्यानंतर किरण चोरमले (नाबाद १२ धावा), दिव्यांग हिंगणेकर(११ धावा) यांनी महत्त्वपूर्ण धावा काढून संघाला १८७ धावा उभारून दिल्या.
संक्षिप्त धावफलक :
रत्नागिरी जेट्स : २० षटकांत चार बाद १८७ धावा (अझीम काझी ७२, धीरज फटांगरे ५७, अथर्व धर्माधिकारी २३, किरण चोरमले नाबाद १२, दिव्यांग हिंगणेकर ११, सिद्धेश वीर १-२३, हितेश वाळुंज १-२६) विजयी वि. रायगड रॉयल्स : २० षटकांत नऊ बाद १२० धावा (नीरज जोशी १९, सिद्धेश वीर १८, साव्या गजराज १६, रवींद्र जाधव १६, सत्यजीत बच्चाव ३-१७, प्रथमेश गावडे २-१८, प्रदीप दाढे २-१६, किरण चोरमले २-३१) सामनावीर ः अझीम काझी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 11-06-2025














