रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात आजपासून दृष्टिदान पंधरवड्याला सुरुवात झाली. डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक होऊन गेले.
त्यांचा जन्म १० जून १९२६ रोजी धारशिव (पूर्वीचा उस्मानाबाद) जिल्ह्यात झाला. डॉ. भालचंद्र यांनी आपल्या शासकीय सेवेत पन्नास हजाराहून अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया त्या काळी करून अनेक अंध रुग्णांना दृष्टी प्राप्त करून दिली. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी नेत्ररुग्ण सेवा केली.त्यांचा मृत्यू त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच १० जून १९७९ रोजी झाला. त्यांना ५३ वर्षांचे आयुष्य मिळाले. त्यांच्या नेत्रसेवेमुळे ते अमर राहिले. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १० जून हा दिवस दृष्टिदान दिन दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या वर्षीपर्यंत १० जूनपासून सात दिवस दृष्टिदान सप्ताह साजरा केला जात होता. यावर्षीपासून १० जून रोजी दृष्टिदिन साजरा करून त्याबरोबर पुढील पंधरा दिवस दृष्टिदान पंधरवडा साजरा केला जाणार आहे.
दृष्टिदान पंधरवड्यात शासकीय व स्वयंसेवी संस्थांमध्ये जास्तीत जास्त मोतिबिंदू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात या पंधरवड्यात २४० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाच्या आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिरे आयोजित करून आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत रुग्ण शोधून काढून वैद्यकीय अधिकारी व नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा रुग्णालय तसेच शासनाने नेमून दिलेल्या नॅब रुग्णालय, डेरवण येथील वालावलकर महाविद्यालय व रुग्णालय आणि रत्नागिरीतील लायन्स नेत्र रुग्णालयाकडे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहेत.
या पंधरवड्यात नेत्रदानासाठी नेत्रदान प्रतिज्ञापत्र पत्र भरून घेतले जाणार आहे. मरणोत्तर नेत्रदान स्वीकारले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयातर्फे तीन नेत्रशल्य चिकित्सक या पंधरवड्यात नेमण्यात आले असून दृष्टिदान पंधरवड्यानिमित्ताने जास्तीत जास्त नेत्ररुग्णांनी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 11-06-2025














