रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे-गणपतीपुळे मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले. जवळपास चार ते पाच मिनिटे हा बिबट्या रस्त्यावरच थांबुन होता. गणपतीपुळ्याचे उमेश घनवटकर यांना रविवारी सायंकाळी हा बिबट्या दिसला. त्यांनी मोटारगाडीतून त्याचा व्हिडिओसुद्धा केला असून, तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. नर बिबट्या साधारण अडीच फूट उंच व सात ते आठ फुट लांबीचा आहे.
रत्नागिरी तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्या दिसत असल्याच्या बातम्या येत आहेत. उमेश घनवटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रविवारी कोतवडेमार्गे गणपतीपुळ्यात घरी मोटारगाडीतून मी व मुलगा ऋग्वेद असे दोघेजण निघालो होतो. त्यावेळी कोतवड्याचा चढाव पार करून नेवरे कोकणवाडीच्या नजीक पोहोचलो. त्यावेळी वळणावर बिबट्या रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसले. आम्ही गाडी ताबडतोब धांबवली आणि बिबट्या जाण्याची वाट पाहिली; पण तो जात नव्हता. तो थोडा आक्रमक वाटत होता.
घनवटकर यांनी प्रसंगावधान राखले. गाडी बाजूला घेतली तसेच त्याचे आयफोनवर चित्रीकरणही केले. या चित्रफितीमध्ये बिबट्या एका झाडाजवळ पानांचा वास घेत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर बिबट्या अतिशय आरामात पुढे जात होता. पाच-दहा फूट पुढे गेल्यानंतर तो पुन्हा थांबला. नंतर रस्ता पार करून जंगलात गेला. बिबट्या त्या वळणावर असल्याने समोरून कोण वाहनचालक येत असल्याचे आम्हाला दिसत नव्हते. सुदैवाने, कोणताही दुचाकीचालक समोरून किंवा आमच्या मागून न आल्यामुळे पुढचा धोका टळल्याचे घनवटकर यांनी सांगितले.
काळजी घेण्याचे आवाहन
कोतवडे, नेवरे व गणपतीपुळे मार्गावर वाहनचालकांनी वाहने काळजीपूर्वक हाकावीत तसेच रस्त्याच्या आजूबाजूला लक्ष ठेवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 11/Jun/2025














