गुहागर : काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद चाचे हे लवकरच काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्ष निवडताना पक्षाने विश्वासात न घेतल्याने ते नाराज असून, मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात पक्षातून सहकार्य मिळाले नाही, तसेच केलेल्या कार्याची पक्षाने दखल न घेतल्याचे खंत त्यांनी बोलून दाखविली आहे. दरम्यान, चाचे हे अजित पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध होत आहे.
मिलिंद चाचे यांनी गुहागर तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे. या काळात त्यांनी कोळी समाजाच्या जमिनीचा प्रश्न, अंगणवाडीच्या समस्या, गणपती व होळी सणासाठी चाकरमान्यांना एस.टी. बससेवा, पाणी समस्या आदी विषयांवर काम केले. मात्र, पक्षाने तालुकाध्यक्ष निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नाही व आपल्या कार्याची दखलही घेतली नसल्याचे चाचे यांचे म्हणणे आहे. गेले काही दिवस ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे चाचे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्यास पडवे जि. प. गटात पक्षाचे वजन वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 11-06-2025














