संगमेश्वर : शास्त्री नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनचे प्रात्यक्षिक

संगमेश्वर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांचा बचाव कसा करावा, यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी (दि. ९) सायंकाळी शास्त्री नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे (मॉकड्रिल) आयोजन करण्यात आले होते. शहरातील गद्रे वखार विसर्जन घाटावर झालेल्या या मॉकड्रिलमध्ये पूरस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

सोमवारी सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत हे मॉकड्रिल पार पडले. अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून बचावकार्य कसे राबवावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांना बोटींगचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच घरातल्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून पुराच्या पाण्यात स्वतःचा जीव कसा वाचवता येतो, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या महत्त्वपूर्ण सरावासाठी संगमेश्वर पोलीस दलाचे २ अधिकारी, १० अंमलदार, ६ होमगार्ड, नावडी गावातील ८ तरबेज पोहणारे सदस्य आणि नावडी ग्रामपंचायतीचे ५ कर्मचारी सहभागी झाले होते. या एकत्रित सरावामुळे आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 11/Jun/2025