Axiom Mission-४: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ‘अॅक्सिओम-४’ मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. ‘स्टॅटिक फायर’ चाचणीनंतर बूस्टरच्या तपासणीदरम्यान यानात लिक्वीड ऑक्सिजन (LOx) गळती आढळून आल्यानंतर मोहिमेवर ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर आयएसएसमध्ये जाणार आहेत.
ऑक्सिजन गळतीमुळे स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) नियोजित अॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलल्याची पुष्टी केली आहे. हे मिशन बुधवारी(९ जून) सांयकाळी ५.३० वाजता प्रक्षेपित होणार होते. दरम्यान, ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणि रेंज उपलब्धतेनुसार नवीन प्रक्षेपण तारीख शेअर केली जाईल, असेही स्पेसएक्सने सांगितले.
१४ दिवसांची अंतराळ यात्रा
शुभांशू शुक्ला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि नासा समर्थित अॅक्सिओम स्पेसच्या व्यावसायिक अंतराळयानाचा भाग आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, बुधवारी सांयकाळी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे १४ दिवसांच्या प्रवासासाठी निघणार होते, मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.
४१ वर्षांनंतर भारतीयाची अंतराळ मोहीम
शुभांशू शुक्ला सुमारे ४१ वर्षांनी एक भारतीय म्हणून अवकाशा यात्रा करणार होते. यापूर्वी राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉसमॉस मोहिमेद्वारे ८ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती.
कोण आहेत शुभांशू शुक्ला?
१० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये जन्मलेले शुभांशू शुक्ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) चे विद्यार्थी आहेत. २००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले होते. त्यांना सुखोई-३० एमकेआय, मिग-२९, जग्वार आणि डोर्नियर-२२८ यासह विविध प्रकारच्या विमानांवर २ हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IIS), बंगळुरू येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेक पदवी देखील मिळवली आहे.
शुभांशू गगनयान मोहिमेचा भाग
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची २०१९ मध्ये गगनयान मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीर संघात निवड झाली आहे. हे गगनयान २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 11-06-2025














