चिपळूण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभार्ली घाटाची अत्यंत बिकट व धोकादायक अवस्था झाली असून, या घाटातून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कुंभार्ली घाटातून अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
दि. १० जून रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन शिबिरात मुकादम यांनी ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अधिकृतरीत्या मांडली.
मुकादम म्हणाले की, “कुंभार्ली घाटातील अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. घाट दुरुस्त नसल्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका वाढतोय. मोठ्या वाहनांच्या संख्येमुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांना घाट चढ-उतार करताना जीव मुठीत धरावा लागतो. अशा स्थितीत या घाटामध्ये २० ते २५ चाकी अवजड वाहनांची वाहतूक बंद करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी सूचित केलं की, “भोर घाटात जशा पद्धतीने दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम झाले आहे, त्याप्रमाणे कुंभार्ली घाटासाठी देखील अशा अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात.”
यावेळी त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधले की, “पूर्वी हा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, परंतु आता तो नॅशनल हायवे चिपळूण यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, या विभागाकडून आवश्यक तातडीच्या कामांना फारसा गती मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.”
गुहागर- विजापूर तीन पदरी महामार्गाचे कामही अनेक वर्षांपासून रखडलेले असून, सरकारचे धोरण हेच अपघातांचे एक प्रमुख कारण असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. “गुहागर- विजापूर हायवे मंजूर असूनही तो वर्षानुवर्षे प्रलंबित, आणि दुसरीकडे घाटात एकच पदरी रस्ता – हे धोरण सरकारचे अपयश आहे,” असा रोष त्यांनी व्यक्त केला.
“शासनाने आणखी किती बळी घेतल्यावर जाग येणार?” असा रोखठोक सवाल करत मुकादम यांनी पावसाळ्यात कुंभार्ली घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आणावी आणि घाटाचे तातडीने रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 11/Jun/2025














