रत्नागिरी जिल्ह्याच्या सेवेत 112 नवीन पोलीस शिपाई दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात आज एक नवा अध्याय सुरू झाला. मूलभूत पोलीस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून 112 नवप्रविष्ट पोलीस शिपाई रत्नागिरी पोलीस मुख्यालयात दाखल झाले. यात 66 पुरुष आणि 45 महिला शिपाई यांचा समावेश आहे, ज्यांना अनुक्रमे बाभळगाव (लातूर), तुरची (सांगली) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये आणि नाणवीज (दौंड) येथील चालक पोलीस प्रशिक्षण केंद्रात मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

मंगळवारी सकाळी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व नवीन शिपायांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सर्व शिपायांना त्यांच्या कर्तव्याप्रति समर्पण, शिस्तबद्धता आणि सोशल मीडियावर योग्य वर्तन राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘स्मार्ट पोलिसिंग’वर भर देत सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडण्याबाबत आणि स्वतःला वेळोवेळी अद्ययावत (अपग्रेड) करण्याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश कसे मिळवावे, याबद्दलही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, महिला नवप्रविष्ट पोलीस शिपाई श्रीमती. कोमल सावते यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची (सांगली) येथे “सर्वोत्तम कमांडो कोर्स प्रशिक्षणार्थी” म्हणून, तर श्रीमती. अंजली यादव यांचे “सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी” म्हणून निवड झाल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांनीही सर्व 112 नवप्रविष्ट पोलीस शिपायांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे नाव आपल्या कर्तुत्वातून उंचावण्यासाठी प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (पो. मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय श्री. राजेंद्र कुळसंगे, पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी, पोलीस कवायत प्रशिक्षक पोलीस हवालदार श्री. सावंत, पोलीस हवालदार श्री. सार्दळ आणि इतर अंमलदार उपस्थित होते. या नव्या दमाच्या पोलीस शिपायांच्या आगमनाने रत्नागिरी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 11-06-2025