राजापूर हादरले! निवृत्त शिक्षकाच्या घरातून लाखो रुपयांची चोरी, शेजारच्या घरांनाही लक्ष्य

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोंडये तर्फे सौंदळ येथे एका निवृत्त शिक्षकाच्या घरातून तब्बल रु. ३,९३,०००/- किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेजारील तीन बंद घरांनाही लक्ष्य करत चोरीचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सहदेव महाडेश्वर (वय ६२, सेवानिवृत्त शिक्षक, मूळ रा. तिवरे ता. कणकवली, सध्या रा. कोंडये तर्फे सौंदळ ता. राजापूर) यांच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी ०९/०६/२०२५ रोजी रात्री ११.३० ते १०/०६/२०२५ रोजी सकाळी ७.०० वाजेदरम्यान लक्ष्य केले. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातून रु. ३,८६,०००/- किमतीचे सोन्याचे दागिने, रु. २,०००/- किमतीचे चांदीचे पैंजण आणि रु. ५,०००/- रोख रक्कम असा एकूण रु. ३,९३,०००/- किमतीचा ऐवज चोरून नेला.

याचबरोबर, फिर्यादींच्या शेजारी राहणारे मुरलीधर मोरे, योगेश सुरेश मोरे, अविनाश तावडे आणि शशिकांत लाड यांच्याही बंद घरांची कडी-कुलुपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची तक्रार १०/०६/२०२५ रोजी दुपारी ४.२९ वाजता राजापूर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांनी आपल्या घरांची सुरक्षा अधिक कडक करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 11-06-2025