संगमेश्वर : कामावर जाण्यास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवकाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास किसन चव्हाण (वय २६, रा. लोवले, मूळ रा. अलिबादी तांडा, विजापूर, कर्नाटक) हे मजूर म्हणून काम करतात. दिनांक ०९/०६/२०२५ रोजी रात्री ७.२० वाजण्याच्या सुमारास ते लोवले येथील त्यांच्या राहत्या झोपडीत होते. त्यावेळी आरोपी नामदेव उमलु चव्हाण (वय ४६), विनोद नामदेव चव्हाण (वय २२) आणि अनिल धनसिंग चव्हाण (वय २७, सर्व रा. लोवले, मूळ रा. अलिबादी तांडा, विजापूर, कर्नाटक) यांनी त्यांना “तू कामावर का जाणार नाहीस?” असे विचारले.
यावर विकास चव्हाण यांनी, “माझ्या छातीत दुखत असल्याने मी कामावर जाणार नाही. पण तुम्ही आधीपासूनच मला का मारणार होतात, ते मला सांगा,” असे विचारले. हे ऐकून आरोपी नामदेव चव्हाण संतापले आणि त्यांनी विकासला शिवीगाळ करत, “ए भिकारचोट, तू सकाळी पण कामावर जाणार नाहीस असे सांगितले होतेस. तुझे पैसे अजून फिटले नाहीत, तू कामावर का जाणार नाहीस?” असे बोलून हाताने व लाथेने मारहाण करण्यास सुरुवात केली.
याचवेळी आरोपी अनिल धनसिंग चव्हाण याने खाली पडलेली लाकडी रीप हातात घेऊन ती विकासच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारून त्याला गंभीर दुखापत केली. विकासची पत्नी आरती विकास चव्हाण यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी नामदेव चव्हाणने त्यांना ढकलून दिले, त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. त्यानंतर आरोपी १, २ आणि ३ यांनी संगनमत करून विकासला शिवीगाळ करत हाताने व लाथेने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर जखमी विकास चव्हाण यांना दिनांक १०/०६/२०२५ रोजी पहाटे १.५६ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८६/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 11-06-2025














