रत्नागिरी, लांजा: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कौटुंबिक वादातून एका महिलेवर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्ले मुस्लिमवाडी येथे दि. ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी महिलेच्या दिरावर आणि सासऱ्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा दिलदार थोडगे (वय ३०, रा. लांजा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आयशा थोडगे आणि आरोपी मुबारक इब्रहिम थोडगे (वय ४५) आणि इब्रहिम यनस थोडगे (वय ७०) हे एकाच घरात विभक्त राहतात. त्यांच्यात घरगुती कारणांवरून नेहमीच वाद होत असत.
घटनेच्या दिवशी, म्हणजेच ६ जून रोजी सायंकाळी आयशा यांचे पती दिलदार इब्रहीम थोडगे चिपळूणहून परतल्यानंतर त्यांनी आपली चारचाकी गाडी घराच्या पार्किंग शेडमध्ये लावली. त्यावेळी आरोपी मुबारक आणि इब्रहिम यांनी “येथे गाडी लावायची नाही, तुझे येथे काहीही नाही” असे म्हणत त्यांना अडवले. यावर दिलदार यांनी “गाडी इथेच लावणार” असे उत्तर दिल्यावर आरोपींनी चारचाकीच्या काचेवर हात मारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून फिर्यादी आयशा घराबाहेर आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. आरोपी मुबारकने नारळाच्या झापाने आयशा यांना मारहाण केली आणि “ठहरामखोर बाई तू इकडे ये, तुला खलास करतो, तू सर्व भांडणाची जड आहेस तुला कोयतीने कापून टाकतो,” अशी धमकी दिली. इतकेच नाही तर आरोपी मुबारक कोयती घेऊन आयशा यांच्या अंगावर धावून आला. स्वतःचा बचाव करण्यासाठी आयशा यांनी हात मध्ये घातला असता, कोयती त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला आणि उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाला लागून त्यांना दुखापत झाली.
या घटनेनंतर आयशा दिलदार थोडगे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी १० जून २०२५ रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. लांजा पोलिसांनी गु.र.नं. ११९/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८ (१), ३५२, ३५१(२), १३१, २३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 11-06-2025














