चिपळूण : टेरव येथील भवानीमातेचा १३ जून रोजी गोंधळ

चिपळूण : टेरव येथील भवानीमातेचा गोंधळ येत्या शुक्रवारी, १३ जून रोजी होणार आहे. गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदात साजरा होणार आहे. भवानीमाता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानीमातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

वैष्णवामध्ये भजन-कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. श्री भवानीमता ही ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी आहे. गोंधळ हा भवानीमातेचा मुख्य व महत्त्वाचा धार्मिक विधी आहे.

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्यानंतर दिवट्या पाजळून घटाभोवती पाच प्रदक्षिणा घालून उद्घोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील. कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गा-हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल. या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेरव ग्रामस्थांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 11/Jun/2025