रत्नागिरीत डंपरने वासराला धडक देऊन चालक पसार!

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल, १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात डंपर चालकाने वासराला धडक देऊन गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना हातखंबा ते रत्नागिरी रस्त्यावर कारवांचीवाडी फाट्यापासून १०० मीटर अंतरावर, राहुल ट्रेडर्स दुकानासमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार उदय भाऊसाहेब बांदल (वय ३९) आणि त्यांचे सहकारी पोलीस ठाणे डायल ११२ वाहनातून गस्त घालत असताना त्यांना हा अपघात दिसला. एका अज्ञात डंपर चालकाने आपला डंपर अति वेगाने व बेदरकारपणे चालवत रस्ता ओलांडणाऱ्या एका काळसर-पांढरट रंगाच्या गायीच्या वासराला जोरदार धडक दिली. या धडकेत वासराच्या उजव्या पायाला खुराजवळ गंभीर दुखापत झाली.

अपघात घडवल्यानंतर डंपर चालक मदतीसाठी थांबला नाही, तर थेट रत्नागिरीच्या दिशेने निघून गेला. फिर्यादी उदय बांदल यांच्या तक्रारीनुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, ३२५ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४/१७७ नुसार गुन्हा (गु.र.नं. ११६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या अज्ञात डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 11-06-2025