दापोली : दापोली एस.टी. स्टँडवर १० मे २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका मोटार अपघातात ७० वर्षीय वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी एस.टी. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी वनिता तुकाराम चोपडे (वय ७०, व्यवसाय-गृहिणी, रा. खेर्डी, चोपडेवाडी ता. दापोली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या खेर्डी येथे जाणाऱ्या बससाठी बस स्टँडवरील प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. एस.टी. बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. २३०० ही प्लॅटफॉर्मसमोर लागली. ती कोणती बस आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी एस.टी. बसच्या उजव्या बाजूने पुढे जात असताना, आरोपी पुंडलिक शिवाजी केंद्रे (वय ३६, व्यवसाय-एस.टी. बस चालक, दापोली बस आगार) याने आजूबाजूला न पाहता बस अचानक मागे घेतली.
यामुळे बसचे पुढील उजवीकडील चाक वनिता चोपडे यांच्या उजव्या पायावरून गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. एस.टी. बस चालकाच्या हयगयीमुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दापोली पोलिसांनी या प्रकरणी १० जून २०२५ रोजी १६.०१ वाजता गुन्हा रजि. नं. १०८/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १२५ (क) (अ), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 11-06-2025














